आमचा प्रवास कोणत्या दिशेने सुरु आहे

भारतात महिलांच्या मालकीचे तीस लाख उद्योग आहेत. वर्षाला ११% या वेगाने वाढत चाललेल्या सूक्ष्म-उद्योग क्षेत्रामध्ये लाखो लोकांना गरिबीतून बाहेर खेचून काढण्याची आणि प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. २०१४ मधील इंटरनॅशनल फायनान्स कॉर्प. (आय.एफ.सी.) यांच्या अभ्यासानुसार, या महिलांच्या मालकीच्या उद्योगांपैकी फक्त एक चतुर्थांश भागाला औपचारिक पतपुरवठा उपलब्ध आहे. इतरांना अनौपचारिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते आणि प्रचंड दराने व्याज भरावे लागते.

ही ११६ बिलियन डॉलर्स इतकी भरुन न निघालेली पोकळी म्हणजे वित्तसंस्थांसाठी एक खूप मोठी संधी आहे, विशेषतः महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना पतपुरवठ्यातील धोक्यांच्या दॄष्टीने कितीतरी चांगले समजले जाते तेव्हा.

महिला सूक्ष्म-उद्योजकांकरिता परवडणाऱ्या दरात पतपुरवठा उपलब्ध करण्यासाठी आणि त्यातील तज्ज्ञ बनण्यासाठी आज माणदेशी कटीबद्ध आहे. आम्ही डिजिटल साक्षरतेचा प्रसार करतो आणि ग्रामीण महिलांना कॅशलेस अर्थकारण शिकण्यास व त्याचा फायदा करुन घेण्यास मदत करतो. महिला सूक्ष्म-उद्योजकांना आपले व्यवसाय पुढील स्तरावर घेऊन जाण्यास मदत करण्याच्या दृष्टीने त्यांना कर्ज उपलब्ध करुन देणारा देशातील पहिला सोशल इम्पॅक्ट फंड उभा करण्याचे कामही आम्ही करीत आहोत.